Monday, November 4, 2013

पाणी

खूप खरवडू नये    कुठल्याच गोष्टीचा पृष्टभाग
हमखास बक्षिसाची अपेक्षाही करू नये स्क्रॅच-अॅंड-विन सारखी

बांधावे जन्मजात कुतूहल    रूटीनच्या मजबूत खांबाला अन
अडकवावा गळ्यात त्याच्या हळूहळू गमावलेल्या कातडीचा पट्टा

ज्यांना भय छेडते सतत   कृष्णविवरातल्या एकांत वाटचालीचे
त्यांनी घासू नयेत लोकांचे चेहरे, ना स्वत:भोवतीच्या भिंतींचे रंग

धीराचे वळावेत कासरे दोर   हिंमत बांधावी करकचून पाठीवर
अन्यथा डोकाऊ नये खूप स्वत:च्याही आत, दृष्टीआड ठेवावे अंत:पूर

नसेल खोल दमसास तर वरचेवर तरंगावे   खोलवर मारू नये सूर
कुणाच्याही नाकातोंडापासून पाणी    तसे कधीच नसते फार दूर



(‘मौज’  दिवाळी २०१३)

Saturday, September 7, 2013

उरातल्या रोख जखमा

ठरवल्याप्रमाणे एवढे रान कापले
पण नेमका बांधावर येऊन भरकटलो
विहीरीचा उपसलेला सगळा गाळ
परत ओतावा तसा मूळ जागी आलो

कुठल्या उन्हाची वाट पाहिली नाही
धगधगत्या देहापाण्याचा वाफसा केला
तिफणीच्या नळ्यातून मूठभर पडलो जिथे
तिथल्या मातीत रुजलो वाढलो

पुरूषभर तणात वाढ केली स्वत:ची
तवाजाळ दुष्काळात तगवून ठेवले स्वत:ला
मग मातीतून स्वत:लाच उपटून घेऊन
निघालो नव्या दिशांच्या स्वागताला

दिशांच्या टोकांवर क्षितीजाजवळ रमलो
पेललाही काही काळ दिशांनी दिलेला चकमा
पोहोचू पोहोचू म्हणत मधेच दमलो तेंव्हा
रात्रभर मोजल्या उरातल्या रोख जखमा


- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १

Monday, August 26, 2013

उभे अठ्ठावीस

कुणाला वाळीत टाकायचे कुणाला वाळवंटात
कुणाकडून ओवाळून घ्यायचे
ठरवून घेतले
कुणाची दुकाने चालू द्यायची
कुणाला तिर्थयात्रेला पाठवायचे
कुणाला निरोप द्यायचे
यादी केली

कुणाला खेटायचे रेटायचे
कुठपर्यंत चालायचे  कुठे बसायचे
मुक्काम निश्चित केले
कुणाची गाथा तरणार
कुणाला दर्शन साक्षात्कार होणार
मनात त्यांची 
रांग केली

उभे अठ्ठावीस आडवे केले
त्यांवरील प्रावरणे झटकली
दूर केली
उगवतीचे हिशोब
मावळतीपर्यंत नेले
प्रत्येक सूर्य प्रदक्षिणेचा धूर केला
रस्ता मक्रूर केला  


चंदनाचा गंध लावून पितांबर नेसून
कमरेवर हात ठेवून
हवं तिथे जात राहिलो
डोळे झाकून वर्षानुवर्षे
विटेवर उभारण्यांचं नाटक करत
सगळं लख्ख
पहात राहिलो


- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १

तू निजल्या रात्रीचे खडे उतार

तुझ्या निसरड्या परिघावरून घरंगळत राहिलो कायम  थांबताच आले नाही
तुझ्या त्रिज्येवरून तोल सावरत तुझ्या केंद्रबिंदूपर्यंत येताना  पडत राहिलो खाली

तुझी भूमिती मला आकळली नाही तुझे हात आखडणारे  मोजत राहिलो रोज
तुझा गुणाकार सगळ्याशी करत तुझी बेरीज  तुझ्याविना अपूर्णांक उरत राहिलो

तुझी बीजे ना रूजली ना कुजली माझ्यात  तुझी गणिते कोरडी सोडवत राहिलो  
माझ्यातून उगवलीस तर किती कशी वाढशील  याची प्रमेये मांडत राहिलो कायम

लघुकोन काटकोन तीनशे साठ अंशांचा कोन   वळून सैरभैर पहात राहिलो तुला
दोन डोळ्यांचे पृष्टफळ व्यापून उरलीस तेंव्हा  तुझे बिंदू अंगभर शोधत राहिलो

तुझ्या ओठांचे अष्टकोन बोलले नाहीत फुलले नाहीत  साद घालत राहिलो तुला
दुपारी तुझे वर्ग संध्याकाळी घन करताना उरात आला दिवस  ओलीस ठेवत राहिलो

सरळ रेषेत जात राहिलीस उतारावर मोकाट चाकासारखी  झटकत धूळ टाकत कात
तुझ्यामागे रंगत गेलो रांगत गेलो धावत   ठेचकाळत वर्तुळात तुझ्या फिरत राहिलो

तू निजल्या रात्रीचे खडे उतार माझ्यासाठी चढाव झाले  न संपणारे  मी चढत राहिलो
रात्रभर करत तुझ्या स्वप्नांचे दरवाजे उघडण्याचे प्रयोग  न संपणारे  मी कढत राहिलो


- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १

कितीही लपविला आता देह


निर्णायक निर्वाणास पोहोचून मंदावू लागलेला भाता   हळूहळू जमीनीवर कोसळणारा बाण
स्तब्ध शांततेत फक्त खोल श्वास पेरून क्षणात उगवलेले  अंघभर शहारे  जोपासणे तुझा प्राण 

तप्त वाफाळलेल्या शरीराने मनावरच्या सगळ्या घड्या   रेषा ताण जखमा व्रण पुसून
कुठल्यातरी ठोक्यास तुटले मग घड्याळाचे काटे दोन   गळतोय एक हळूच उन्मळून

तुझ्या सैलावलेल्या भुवयांवर विसावलेय  देखणे सुख  अर्धोन्मिलित कोरीव कोरड ओठांत
कित्येक शतकांपासून मला न आलेली नीज  उतरतेय हळूहळू  परततेय तुझ्या डोळ्यांत

लयबद्ध हालचालींचे जाळे तुटल्यावर आडव्या पडलेल्या   दोन रेषांसारखे दोन नि:शब्द हुंकार
अर्धमालवलेल्या दिव्यापासून तुझ्या माझ्यापर्यंत ताणलेले तारांगण   मंद प्रकाश मंद अंधार

तरंगत्या तरलतेने हातावर येऊन लोपलेला अवकाश लोपलेली अर्धी तू  लोपलेला अर्धा मी सावरून
उमटतेय काही  चमकताहेत डोळे आकुंचताहेत बाहुल्या   ओढताना स्वत:वर तुझे अर्धे पांघरूण

कितीही लपविला आता देह हात पाय डोळे दोन   उजेडात येतोच रापलेला एक दाह काहीक्षण
एकदा उतरवले कपडे  विवस्त्र झालो स्वत:समोर   की मिळते कशानेही न झाकणारे नागवेपण



- महेश 
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १

नॉस्टॅल्जिक वर्तमानाच्या उंबरठ्यावर

मी बसतो नॉस्टॅल्जिक वर्तमानाच्या उंबरठ्यावर  वाजवत मृदंग उभ्या  रात्री सात
भूतभविष्याच्या सर्व शक्यतांची पोटे फाडत  पाहात डोकावून आत  जळते वात

मी नख्या घुसवतो खोलवर  अन वाचत रहातो   वास्तवाचा अवास्तव अपेक्षाग्रंथ
कसोशीने एकेक पान उलटत कवेत घेत आयुष्य  वाहात रहातो  अडखळतो संथ

मी चिरत रहातो भूतकाळाचे सत्चिदानंद कमनिय खांब  उद्याची त्यावर  कोरतो नक्षी
काढतो ठिसूळ अवशेष बाजूला  उभारतो एखादया विठेवर  पसरतो पंख देखणा पक्षी

मी उसवत जातो एकेक वीण मातीची  उतरवत रहातो एकेक  जरतारी वस्त्रे भारी
टोचून घेतो सुईचे टोक सक्तीने भळाळते रक्त  लावण्याची जीव  शिकतो रीत न्यारी

रात्रीच्या अंगणात पाहतो मी दिवसांचे माझ्या सूळ  सावज त्यांनी हेरलेले  उडवून पसाभर धूळ
पेरलेल्या डोळयांत मग उगवते भलतेच खूळ  कोण्या आभाळाच्या शोधासाठी  जाते खोलवर मूळ



- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १

पाणी

खूप खरवडू नये
कुठल्याच गोष्टीचा पृष्टभाग
हमखास बक्षिसाची अपेक्षाही करू नये स्क्रॅच-अँड-विन सारखी

बांधावे जन्मजात कुतूहल
रूटीनच्या मजबूत खांबाला
अडकवावा गळ्यात त्याच्या हळूहळू गमावलेल्या कातडीचा पट्टा

ज्यांना भय छेडते सतत
कृष्णविवरातल्या एकांत वाटचालीचे
त्यांनी घासू नयेत लोकांचे चेहरे, ना स्वत:भोवतीच्या भिंतींचे रंग

धीराचे वळावेत कासरे दोर
हिंमत बांधावी करकचून पाठीवर
अन्यथा डोकाऊ नये खूप स्वत:च्याही आत, दृष्टीआड ठेवावे अंत:पूर

नसेल खोल दमसास तर
तरंगावे वरचेवर, खोलवर मारू नये सूर
कुणाच्याही नाकातोंडापासून पाणी  तसे कधीच नसते फार दूर



- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १