अस्सल शंकांना
निरूत्तर करण्याचे
सार्वजनिक धोरण
स्वत:पुरते राबवत मी
साधतो
अस्तित्वाच्या
प्रश्नांवर
गप्प राहण्याची
किमया
आपल्याच
स्वप्नांच्या फायली
पडलेल्या तुंबून
इतक्या की
त्यांच्यात डोके
घालताना
दिवसाच्या कामकाजातून
तरल सहजतेने वगळतो
असाहाय वेदनेच्या
पांचजन्यातून
उठणारे करूणध्वनी
रात्रीची सरपटणारी
पाल मात्र
चुकचुकत रहाते
उशाशी माझ्या
अनिर्बंध प्रश्नांच्या
फैरी
झडत रहातात
स्वत:वर
डोक्यामध्ये चालू
राहतो
अव्याहत शून्यप्रहर
अभूतपूर्व गोंधळात
होते
मयसभा तहकूब
जगण्याला स्थगिती
मिळतच रहाते
अनिश्चित
कालावधीसाठी
- महेश
निद्रानाशाची
रोजनिशी/ ड्राफ्ट १