Monday, March 11, 2013

सहा लिटर पाणी फ्लश करताना...


image courtsey: http://m.indiatoday.in/
हापसून जीव जायचा तरिही
बुडालेली घागर यायची नाही वर
मैलभर पडलेली कोरड शमवायला
मग रांग लावायचो उन्हात
घशातली आग फुफाट्यापर्यंत पोचायची

माहेरून येणाऱ्या भावाची वाट बघावी
तशी टॅंकरची वाट बघत बसायच्या
पाण्याला आलेल्या बायका
आणि बडबडत रहायच्या चुलीबद्दल
कोरड्या तोंडांनी

वेळ जावा म्हणून चुलता सांगायचा
बहात्तरच्या आठवणी
म्हणायचा, सराटा-इचका-गवत खाल्लं
जनावराबरोबर वाटून
भाकरी मिळाली तर
भूईला पाणी मिळाल्यागत जीव व्हायचा शांत

बोडक्या शिवाराकडे बघत
म्हातारी मैना मावशी
छावणीतल्या गुरांचा दोसरा काढायची
डोक्याला टॉवेल गुंडाळून
बंद गुऱ्हाळाच्या चिमणीजवळ बसलेला नागुमामा
सांगायचा यंदाचं भविष्य कोरडंच आहे म्हणून

धरणाजवळच्या गावात सालगडी राहिलेला दादू
कधीतरी यायचा गावात दुपारच्या वक्ताला
मोकळ्या पिशव्या घेऊन
लेकरांसाठी बाजार शेवचुरमुऱ्यापुरत्याच
हे आठवून भेगाळायची त्याची जमीन

सर्वत्र पसरलेल्या तवाजाळ दुपारी
विहिरीत डोकावणाऱ्या पोरांच्या डोळ्यांत
निपजायची काठोकाठ पाण्याची स्वप्ने
टॅंकर निघून गेल्यावरच्या चिखलात
पोरं खेळायची शेती-शेती फसल-फसल
चिखलाच्या बैलाला तडे जाईपर्यंत

***

सहा लिटर पाणी
एकदम फ्लश करताना
धडकीच भरते उरात

चाललेला मैल आठवतो
चिखलाचा बैल आठवतो




- महेश
निद्रानाशाची रोजनिशी/ ड्राफ्ट १

1 comment: